मुखपृष्ठ

           मांगेला समाज हा पूर्वापार अनादिकाला पासून भारत देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच अरबी समुद्र किनाऱ्यावरचा प्राचीन अपरांत प्रांत म्हणजेच सध्याचा उत्तर कोकणात गुजरातच्या सुरवाडा गांवा पासून मुंबईच्या कुलाब्या पर्यंत वास्तव्यास आहे.

         मांगेला समाज हा मुलत: आदिवासी आहे. त्याचे वास्तव्यही मुख्यत: अनुसूचित क्षेत्रात आहे. कोणतेही धर्म – पंथ, वंश, राजसत्ता या प्रदेशात अस्तित्वात येण्या पूर्वीचा हा आदिवासी समाज आहे. म्हणूनच या समाजाचा उक्त वास्तव्याच्या प्रदेशावर पारंपारिक वहिवाटीचा हक्क आहे.

         समुद्र, खाडी, खांजणात खेडोपाडी राहून खडतर जीवन जगणारा आपला समाज आजही मागासलेल्या अवस्थेत जीवन जगत आहे. तरीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवाची पर्वा न करता उन-पाउस, तुफान वादळवाऱ्यांशी झुंज देत दिवस-रात्र राबून अथांग सागरात मासेमारी करीत आहे. देशातील जनतेस पौष्टिक अन्नाचा पुरवठा करीत असतो, देशास परकीय चलन मिळवून देत असतो आणि तरीहि तो आज हालाकीचे जीवन जगत आहे.

         उपलब्ध दस्तऐवजानुसार, श्री रा. हि. दांडेकर यांनी नमूद केल्यानुसार, धाकटी डहाणू येथे धर्मशाळेत आपल्या जातीच्या मुंबई-माहीम ते सुरवाडा गांवा पर्यंतच्या छपन्न गांवकऱ्यांची सभा दिनांक १४ ते १७ ऑगस्ट १९०९ या कालावधीत सलग चार दिवस भरली होती. त्यात लग्न संबंध व तदनुषंगीक रीतीरिवाज आणि तंटेबखेडे या बाबत एकूण अकरा ठराव पारित करण्यांत आले होते आणि यासाठी गांवोगांवचे प्रतिनिधी हजर होते. त्यानंतर “मांगेले सामाजोन्नत्ती संघ” या नांवाची संघटना सन १९३० च्या दरम्यान कै. हरिभाऊ पागधरे, कै. भिकाजी बुधाजी नाईक गुरुजी, कै. डॉ. लक्ष्मणराव दांडेकर, कै. डॉ. गजानन दांडेकर अशा महनीय समाज धुरिणांनी चालविली होती.मध्यंतरी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मच्छिमारी व्यवसायाशी निगडीत रॉकेल, डीझेल, डांबर व अन्य वस्तूंचा तुटवडा भासू लागल्याने त्यांनी अन्य समाजातील मच्छिमार बांधवांना एकत्र करून “ ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघाची” स्थापना केली. तथापि या संघाच्या कामात हि मंडळी व्यस्त झाल्याने ‘मांगेले सामाजोन्नत्ती संघाचे’ पुढील काम मागे राहिले.

          मच्छिमार व्यावसायिक संघटनां मध्ये मच्छिमार व्यवसायेतर नोकरी, धंदा, शेती आदिशी निगडीत समाज घटकांचा समावेश नाही. गुजरात व मुंबई विभागात राहणाऱ्या मांगेला समाज बंधूंचा देखील समावेश नाही. त्यामुळे मच्छिमार व्यावसाईक व समाजातील अन्य घटकांना एकत्र करून मांगेला समाज संस्कृतीचे जतन करणे, मांगेली बोलीभाषेचे संवर्धन करणे ,शैक्षणिक, सामाजिक आर्थिक विकास करणे इत्यादी उद्दिष्टां साठी एक व्यासपीठ स्थापणे आवश्यक होते. या ध्येयपूर्ती साठी कै. पांडुरंग बाबाजी मेहेर, कै. आत्माराम बाबाजी मेहेर. श्री राजाराम शिणवार पाटील, श्री सुभाष हरिश्चंद्र तामोरे, कै. पांडुरंग विठ्ठल घिवलीकर, श्री दामोदर जनार्दन तांडेल, श्री भगवान बुधाजी मांगेला, कै. हिराजी पांडुरंग वैद्य, श्री पंढरीनाथ भिमजी तामोरे, श्री शंकर भास्कर तांडेल, कै. भालचंद्र गोविंद गोवारी, श्री प्रभुभाई जीवन मांगेला अशा अनेक कार्यकर्त्यांनी सातपाटी, धाकटी डहाणू, मरोली, कफपरेड, कळंब अशा विविध ठिकाणी बैठका घेऊन दिनांक ३ फेब्रुवारी १९९१ रोजी पालघर, जिल्हा- ठाणे येथे गांवोगांवच्या लोकप्रतिनिधींच्या सभेत “अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेची” स्थापना करण्यांत आली. समाज परिषदेचे पहिले अधिवेशन सातपाटी येथे दिनांक ८.१२.१९९१ रोजी घेण्यांत आले. त्यानंतर समाज परिषदेची नोंदणी नोंदणी क्र. १)महा / ४१४ / ठाणे दि. ९.१२.१९९४  २) एफ / ४११३ / ठाणे दि. २१. १. १९९५ अन्वये करण्यांत आली.

            आत्ता पर्यंत समाज परिषदेचे अध्यक्षपद सर्वश्री सुभाष ह. तामोरे, कै. पांडुरंग वि. घिवलीकर (कार्याध्यक्ष), हरेश्वर गो. मर्द, प्रभाकर कृ. चौधरी, पंढरीनाथ भि. तामोरे, राजाराम शि. पाटील, भारत गं. तांडेल यांनी भूषविले असून श्री अशोक ठ. तांडेल हे विद्यमान अध्यक्ष आहेत.